ज्ञानवापीवरून वाराणसीत तणाव, मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्यास बंदी घालण्याची मागणी करणाऱया मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. त्याचबरोबर अॅडव्होकेट जनरल यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देशही दिले. याप्रकरणी आता 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांची पूजा सुरूच राहणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षकारांना त्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, आज मुस्लिम पक्षकारांनी वाराणसीत कडकडीत बंद पाळला. तब्बल सतराशेहून अधिक मुस्लिम नागरिक नमाजासाठी ज्ञानवापी मशीद परिसरात जमा झाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला अंजुमन इंतेझामिया मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.