चंद्रपुरात मानव-वन्यजीव संघर्ष पोहोचला शिगेला, 2021 पासून आतापर्यंत 219 जणांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिह्यात सुरू आहे. आज सकाळी चंद्रपूर जिह्यातील सिंदेवाही वनक्षेत्रातील गुंजेवाहीतील तेंदू पाने तोडायला गेलेल्या चार महिला वाघाच्या बळी ठरल्या. यामुळे पुन्हा एकदा चंद्रपुरातील मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच महिन्यांत 19 जणांचा मृत्यू झाला असून 2021 पासून आतापर्यंत 219 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगण्यासाठी मानव जंगलात जात आहे, तर मानवापासून जीव वाचवण्याचा प्रयत्न वन्यजीव करीत आहेत. जगण्यासाठी दोन्ही घटक जंगलावर अवलंबून आहेत. त्यातून हा संघर्ष सुरू आहे. यामध्ये कधी वन्यजीवांचा, तर कधी मानवाचा बळी जातो. जंगलात सरपण असेल, मोह असेल किंवा पैसे मिळवून देणारी तेंदू पाने असतील, यासाठी जंगललगतची माणसे किर्र जंगलात जातात. जंगलात जाताना वाकून कामे करायची नाही, सर्वांनी एकत्र रहावे, डोक्यामागे माणसाचे चित्र लावावे, असे अनेक उपाय वन विभागाने सुचवले मात्र ते पाळले जात नाहीत.

गावकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

चंद्रपूर जिह्यातील सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही जंगलात वाघाने हल्ला करीत चार महिलांचा बळी घेतल्यानंतर वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते. मात्र वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेत प्रकरण शांत केले. मृतदेह उचलण्यास विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना समजावण्यात वन विभागाला यश आले असून गावकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती आता पूर्णपणे निवळली. वाघाला तातडीने जेरबंद करावे, मृतांच्या वारसांना नोकरी द्यावी, गावाभोवती रात्रीला गस्त घालावी, अशा गावकऱ्यांच्या मागण्या होत्या, त्या मान्य करण्यात आल्या.