कश्मीर खोऱ्यात दहशतवादी गटांची मुजोरी; दुकाने सील करीत धमकीची पोस्टर्स लावली

2236

जम्मू -कश्मीरातील 370 कलम हटवल्यानंतर लष्कराच्या उपस्थितीमुळे शांत बसल्याचे नाटक करणाऱ्या सशस्त्र दहशतवादी गटांनी आता आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. कश्मीर खोऱ्यात अनेक व्यापारीपेठा आणि स्थानिक वसाहतीत फिरून दहशतवाद्यांनी शस्त्रांच्या धाकाने दुकाने सिल करणे आणि सरकारला मदत कराल तर खबरदार अशी धमकी देणारी पोस्टर्स सर्वत्र लावून काश्मिरी जनतेत दहशत पसरवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांनी भीतीने या दहशतवादी धिंगाण्यांवर मौन बाळगले आहे.कुठेही अशा दहशतवादी उच्छादाबाबत साधी तक्रार दाखल करायला जम्मू-कश्मीर पोलीस घाबरत आहेत.त्यामुळे काश्मिरी जनतेत पुन्हा भयाचे वातावरण पसरले आहे.

हिझबुल मुजाहिदीनसह अन्य काश्मिरी दहशतवादी गटांनी स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा उठवत मार्केट ,मशिदी आणि अन्य सार्वजनिक स्थळी धमकीची पोस्टर्स लावून जनता आणि व्यापाऱ्यांत दहशत पसरवणे सुरु केले आहे. हिझबुलच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील मोद्रीगाम गावातील दोन दुकाने लाल टेप कानून सील केली आणि सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांना कामावर जाल तर प्राणास मुकाल ,अशा खुल्या धमक्याही दिल्या.श्रीनगरच्या करन नगर भागात दोन दुकानांवर एल डब्ल्यू ( लास्ट वॉर्निंग ) असा इशारा देणारे संदेश लिहिल्याने श्रीनगरच्या सिव्हिल लाईन भागात जनता भयभीत झाली आहे.

व्यापारी म्हणतात ,दुकाने उघडू पण आमच्या सुरक्षेचे काय ?
कश्मीर खोऱ्यात विविध दहशतवादी गट हळूहळू सक्रिय होऊ लागल्याने व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरली आहे . व्यापारी म्हणतात आम्ही दुकाने उघडू ,पण आमच्या सुरक्षेचे काय? कारण सशस्त्र दहशतवादी गटांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास स्थानिक पोलीस घाबरत आहेत.खोऱ्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे पोलीस अधिकारी खासगीत बोलू लागले आहेत. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी गटांची मुजोरी पुन्हा वाढीस लागल्याचे भयावह चित्र पुन्हा कश्मीर खोऱ्यात दिसू लागले आहे. गंदेरबल आणि फतहेकडाल भागात तर अल बदर या दहशतवादी संघटनेने कश्मिरी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबावर कश्मीरी जनतेने सामूहिक बहिष्कार टाकावा असे धमकीवजा आवाहनही केले आहे. काही भागात फक्त सकाळी 8.30 वाजेपर्यंतच जीवनवश्यक वस्तू विकण्यासाठी दुकाने उघडा आणि त्यानंतर बंद करा असा इशाराच दिला आहे. या दहशतीमुळे केंद्राने कश्मीर खोऱ्यातील निर्बंध उठवल्यानंतर तेथे अधोषित संचारबंदी सुरु असल्याचे चिंतादायक चित्र दिसत आहे.

कोट
जम्मू -कश्मीर पोलीस दहशतवादी गटांच्या कारवायांविरोधात मुग गिळून का गप्प आहेत याचे कारणच कळत नाहीय.ज्यांनी आमचे संरक्षण करायचे ते पोलिसच दहशतवाद्यांना घाबरले तर आम्ही कुणाकडे मदतीसाठी बघायचे – गंदेरबलमधील व्यापारी

आपली प्रतिक्रिया द्या