
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
जम्मू्-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार याला केवळ एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आदिल हा पुलवामा जिह्यातील रहिवासी होता. सप्टेंबर 2016 ते मार्च 2018 या दोन वर्षांच्या काळात त्याला सहा वेळा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
आदिलला सुरक्षा दलाने दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतले होते. पण सबळ पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले होते. 20 वर्षांचा आदिल वर्षभरापूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. लहानपणीच शिक्षण सोडल्यापासून तो मोलमजुरी करायचा. वर्षभरापूर्वी तो आपला भाऊ दरा याच्यासोबत मित्रांना भेटण्यासाठी जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. तो बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. हेरखात्याच्या माहितीनुसार तो 2016पासून लष्कर-ए-तोयब्बासाठी जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आणि लष्करचे कमांडर व दहशतवादी होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी तो मध्यस्थीचे काम करीत असे.
























































