
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरच्या शोपिया येथील ठाण्यावर बुरख्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यांनी हॅण्डग्रेनेड फेकले, तसेच फायरिंगही केली. दहशतवादी हल्ला झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ जवाबी फायरिंग सुरू केली. या चकमकीत एक जवान साकिब मोहिउद्दीनला गोळी लागली. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे त्याचा मृत्यू झाला. दहशतवादी मात्र या जवानाची रायफल घेऊन जंगलात पळून गेले. सुरक्षा दलाच्या जवानांनी आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान तंगधार क्षेत्रात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफ जवानांनी उधळून लावला. या ठिकाणी दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने फायरिंग सुरू केलेली होती, परंतु हिंदुस्थानी जवान सतर्क असल्याने घुसखोरी झाली नाही. या चकमकीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. काल 28 सप्टेंबर रोजी अनंतनाग आणि बडगाम भागात दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आसिफ मलिकसह तीन दहशतवादी ठार झाले.



























































