दहशतवादाचा भस्मासुर उलटू लागला; पाकिस्तानी लष्कराच्या पथकांवर वाढते हल्ले

देशातील कट्टरतावादी जिहादी संघटनांचे लाड पुरवून त्यांना हिंदुस्थानात घुसखोरी करायला लावणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला त्याची मोठी किंमत आता मोजायला लागत आहे. इस्लामी दहशतवादी संघटनांचा भस्मासुर पाकिस्तानी लष्कर आणि पाकच्या राज्यकर्त्यांना लक्ष्य बनवू लागला आहे. त्याचेच प्रत्यंतर गुरुवारी पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यांवर जोरदार हल्ले घडवण्यात झाले. दहशतवादी गटांनी घडवलेल्या या हल्ल्यांत पाकिस्तानचे 20 जवान बळी पडल्याचे वृत्त आहे. लष्करी काफिल्यावरचा पहिला हल्ला उत्तर वजिरीस्तानात तर दुसरा खैबर पख्तुन्वा प्रांतात झाला. या दोन भीषण हल्ल्यांतील गंभीर जखमी सैनिकांची संख्या मोठी असून त्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेल्या पाच महिन्यांत पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यांवर 4 भीषण हल्ले घडवण्यात आले आहेत. त्यात 50 पाकिस्तानी सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्याशी फोनवर बोलून या हल्ल्यांबाबत माहिती घेतली आहे. लष्करी प्रवक्त्याने ग्वादरच्या या हल्ल्याबाबत मात्र माहिती दिली नाही.

वजिरीस्तानात 6 तर ग्वादर हल्ल्यात 14 सैनिकांचा बळी
उत्तर वजिरीस्तानातील लष्करी ताफ्यावरील भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 6 जवान मारले गेले आहेत. हा हल्ला राजमक गावाजवळ झाला. या भागातून सुरक्षेसाठीची गस्त घालून परतणाऱ्या लष्करी पथकावर भीषण हल्ला झाला अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानी लष्करावरही सर्वात मोठा हल्ला हा बलुचिस्तानातील ग्वादर येथे झाला. बलूच राजी अजोय सिंगर (बीआरएएस) नावाच्या बलुची दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या 2 कमाण्डरस्तरीय अधिकाऱ्यांसह 14 लष्करी जवान या दहशतवादी हल्ल्यात मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या