मला माफ करा ! गुहेत फसलेल्या थाई फुटबॉल कोचकडून क्षमायाचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । माये साई ,थायलंड

”गेले दोन आठवडे भयाण गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंची आणि त्यांच्या पालकांची मी माफी मागतो. गुहेतील पाण्यात अडकलेल्या माझ्या फुटबॉलपटूची मला शक्य तितकी सर्व काळजी मी घेतोय. सर्व फुटबॉलपटू सुरक्षित आहेत काळजी करू नका, असे माझे त्यांच्या आई आणि वडिलांना कळकळीचे आवाहन आहे, अशी क्षमायाचना थायलंडच्या गुहेत फसलेल्या ११ थाई फुटबॉलपटूंचे २५ वर्षीय प्रशिक्षक एक्कापोल चान्तवोंग यांनी थायलंडच्या नौदलाला पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जगभरातील सोशल मीडियावर गुहेत सुमारे दोन आठवडे अडकलेल्या थाई फुटबॉलपटूच्या सुटकेच्या प्रयत्नांची माहिती व्हायरल होत आहे. गुहेत फसलेले ११ थाई फुटबॉलर ११ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. अचानक पुराचे पाणी आल्यास त्यात सूर मारून सुरक्षित कसे राहता येईल याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते गुहेत गेले होते. त्यांच्या सुटकेसाठी जगभरातील कोट्यवधी नागरिक प्रार्थना करीत आहेत.

थायलंडच्या नौदलाचे पाणबुडे आणि सूरबाज आता या फुटबॉलपटूंच्या सुटकेच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अमेरिकन हवाईदलानेही या मोहिमेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या घडामोडींत स्वतः फुटबॉलपटूंसोबत गुहेत फसलेले प्रशिक्षक एक्कापोल यांनी पालकांना केलेले निवेदन भावनावश करून सोडणारे आहे. ते म्हणतात, थाई जनतेसह जगभरातील नागरिकांनी आमच्या सुटकेसाठी दिलेले मानसिक बळच आम्हाला गुहेतील भयाण परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ्य देतेय. या फुटबॉलपटूंच्या पालकांनी मुळीच भयभीत होऊ नये. सर्व युवक फुटबॉलर सुरक्षित आहेत. आम्हाला लवकरच गुहेबाहेर काढण्यात नौदलाला यश येईल असा विश्वास आहे. झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही सर्व मला माफ कराल अशी अपेक्षा आहे.

फसलेल्या मुलांनीच दिला पालकांना धीर

थायलंडच्या चियांग राई पर्वतातील थाम लुआंग केव्हमध्ये फसलेल्या छोट्या फुटबॉलपटूंनी त्यांच्या हस्ताक्षरात पालकांना पाठवलेले लेखी संदेश अतिशय बोलके आहेत. बेव नावाचा मुलगा लिहितो, ”डॅड आणि मम्मी काळजी करू नका ,आम्ही सुरक्षित आहोत.” नौदलाच्या सुरबाजांसोबत पाठवलेल्या पत्रात १५ वर्षीय फिलपट फोटी उर्फ निक लिहितो, ”मम, डॅड आणि माझ्या छोट्या भावाला माझा पापा सांगा”. ”मम आम्ही परत घरी आल्यावर तू मला तळलेले पोर्क आणि भाजी खाऊ घालशील का?.” १६ वर्षाचा फिरपात उर्फ नाईट आपल्या पत्रात म्हणतो,”मम, डॅड आणि माझ्या बहिणीला सांगा आम्ही खुशाल आहोत. काळजी करू नका, लवकरच आमची सुटका होईल.” नाईटची आई आपल्या अश्रूंचा महापूर रोखून म्हणाली, ”नाईटच्या हस्ताक्षरातील पत्र पाहून आम्हाला थोडा धीर आलाय. आमच्या मुलांची सुटका कधीही होऊन दे ,  पण ते सर्व सुरक्षित घरी परतू दे. एव्हढीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे.”