थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा; सात्त्विक-चिराग जोडीला विजेतेपद

सात्त्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने रविवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. किताबी लढतीत हिंदुस्थानी जोडीने चेन बो यांग व लियू यी या चिनी जोडीचा पराभव केला.

सात्त्विक-चिराग जोडीने चेन-लियू जोडीचा 46 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 21-15, 21-15 असा धुव्वा उडवित विजेतेपदावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानी जोडीने पहिल्या गेममध्ये 4-1 अशी आघाडी घेतली होती, मात्र चिनी जोडीने 11-10 अशी आघाडी घेण्यात यश मिळविले, पण ब्रेकनंतर पुनरागमन करीत हिंदुस्थानी जोडीने 19-15 अशी मुसंडी मारली. मग सलग दोन गुणांची कमाई करीत पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्ये सात्त्विक-चिराग जोडीने आधी आघाडी घेतली, मग ते पिछाडीवर पडले. शेवटी स्वतःला सावरत दुसरा गेमही जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हंगामातील दुसरे विजेतेपद

सात्त्विक-चिराग जोडीने यंदाच्या हंगामातील दुसरे विजेतेपद पटकाविले. याचबरोबर थायलंड ओपनचेही त्यांचे हे दुसरे विजेतेपद होय. या हिंदुस्थानी जोडीने मार्चमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. वर्षाच्या सुरुवातीला सात्त्विक-चिराग जोडीला मलेशिया ओपन व इंडिया ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सात्त्विक-चिराग जोडी सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर आहे, मात्र या विजेतेपदामुळे ते क्रमवारीतील ‘नंबर वन’चे सिंहासनही काबीज करू शकतात.