थायलंडमध्ये सापडला पाच हजार वर्षांपूर्वीचा व्हेलचा सांगाडा

व्हेलचा सांगाडा, तोही 39 फूट लांब, डोक्याचा भाग तीन मीटर लांब… इतक्या मोठ्या आकाराचा व्हेल मास्याचा सांगाडा थायलंडच्या संशोधकांनी शोधून काढला आहे. बँकॉकच्या सामुत सखोन या भागात खोदकाम करून हा भलामोठा व्हेलचा सांगाडा त्यांनी बाहेर काढला. तोही पाच हजार वर्षांपूर्वीचा…

थायलंडच्या संशोधकांना या व्हेल मास्याचे 80 टक्के अवशेष सुस्थितीत बाहेर काढण्यात यश आले आहे. हा सांगाडा 12 मीटर लांब असून त्याचे डोके 3 मीटर लांब आहे. व्हेलची वयोमर्यादा जाणण्यासाठी त्यावर अधिक संशोधन करण्यात येणार आहे, पण संशोधकांच्या मते हा सांगाडा 3 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो. आजही थायलंडच्या समुद्रात व्हेलचे अस्तित्व टिकून आहे. वर्षानुवर्षे समुद्रात घडत असलेले बदल या सांगाड्यावरील संशोधनामुळे समजणार आहेत. तसेच प्रजातींमध्ये घडत गेलेले बदल या संशोधनामुळे समोर येण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा पर्यावरण मंत्री वरवुत सिप्ला अर्च यांनी व्यक्त केली आहे.

सिंगापूरच्या राष्ट्रीय विश्वविद्यालयातील अभ्यासक मार्क्स चुआ यांच्या म्हणण्यानुसार सुमारे सहा हजार ते तीन हजार वर्षे या मधल्या काळात समुद्राच्या स्तरात खूप मोठ्या प्रमाणात बदल घडला आहे. त्यामुळे या सांगाड्याच्या अभ्यासावरून ते समोर येऊ शकते. या पूर्वी लहान जीव आणि खेकडे सापडत होते, पण जेव्हा अशा एखाद्या मास्याचा सांगाडा सापडतो तेव्हा त्या संशोधनातून समुद्रातील एखाद्या संकटाची जाणीव होऊ शकते. तसेच या सांगाड्याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीदेखील उपयोग होऊ शकतो असे मत चुआ यांनी मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या