
सामना प्रतिनिधी। ठाणे
खुनाच्या गुह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने सुनावणीच्या वेळी थेट न्यायाधीशांवर चप्पल फेकून मारल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात घडली. ही चप्पल न्यायाधीशांच्या उजव्या खांद्याला लागली. यावेळी आरोपीने न्यायाधीशांना शिवीगाळही केली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात आरोपी गणेश गायकवाड विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता. पोलीस बंदोबस्तात ठाणे न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी त्याला हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश गुप्ता यांनी आरोपी गणेश याला ‘तुझा वकील आला आहे का’ असे विचारले. मात्र ‘तुम्हीच मला वकील दिला असून तो येत नाही’ असे प्रत्युत्तर गणेशने दिले. ‘तुला दुसरा वकील देतो, पुढच्या तारखेस केस चालवू’ असे न्यायाधीशांनी सांगताच संतापलेल्या गणेशने पायातील चप्पल काढून न्यायाधीशांना फेकून मारली. यावेळी गणेशने
न्यायाधीशांना शिवीगाळही केली. ही चप्पल त्यांच्या उजव्या खांद्याला लागली असून बंदोबस्तावरील पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले.
वर्षभरातील दुसरी घटना
न्यायाधीशांवर आरोपींकडून चप्पल फेकून मारण्याचे प्रकार यापूर्वीदेखील ठाणे आणि भिवंडी न्यायालयात घडले आहेत. जानेवारीत अश्रफ अन्सारी याने न्यायाधीशांना चप्पल फेकून मारली होती. मात्र न्यायाधीशांना ती चप्पल लागली नव्हती. आरोपींकडून वारंवार होणाऱया न्यायालयातील या हल्ल्यांमुळे न्यायाधीशही असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.




























































