
ठाणे-बोरिवली टनेलसाठी राज्य सरकारच्या सांगण्यावरून म्हाडाने एमएमआरडीएला 6 हजार चौरस मीटर भूखंड दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हाडाला 1173 घरांऐवजी केवळ 1050 घरे मिळाली असून तब्बल 123 घरांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्य अर्जदारांना बसला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5285 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यात अल्प उत्पन्न गटासाठी चितळसर मानपाडा येथील 869 घरांचा समावेश आहे. प्रत्यक्षात येथे घरांच्या उभारणीसाठी म्हाडाने 50 हजार चौरस मीटर जागेचे नियोजन केले होते. खासगी विकासकाने येथे घरे उभारली असून म्हाडाला विकासकाकडून 38 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ बांधून मिळणे अपेक्षित होते, मात्र ठाणे-बोरिवली टनेल उभारण्यासाठी 6 हजार चौरस मीटर जागा म्हाडाकडून एमएमआरडीएला देण्यात आल्यामुळे म्हाडाला केवळ 34 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ बांधून मिळाले आहे. म्हणजेच 1173 घरांऐवजी म्हाडाला आता केवळ 1050 घरांवर समाधान मानावे लागले आहे. त्यातही 181 घरे 25 वर्षांपूर्वी विजेत्या झालेल्या अर्जदारांसाठी राखीव ठेवली असून उर्वरित 869 घरे यंदाच्या सोडतीत विक्रीसाठी काढली आहेत.
भूखंडांचे 35 कोटी किंवा पर्यायी जागा द्या!
चितळसर येथील 6 हजार चौरस मीटर भूखंडाच्या बदल्यात आम्हाला रेडिरेकनरनुसार, 35 कोटी रुपये किंवा पर्यायी जागा द्यावी अशी मागणी म्हाडाने एमएमआरडीएकडे केली, मात्र म्हाडाच्या या पत्राला एमएमआरडीएने केराची टोपली दाखवली. राज्य सरकारनेच ही जमीन म्हाडा कोकण मंडळाला दिली होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्हाला मिळाली, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. त्यामुळे म्हाडा आता सरकारकडे दाद मागणार आहे.