ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी 50 बालकांवर अवघड शस्त्रक्रिया, डॉक्टरांची किमया

सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की, अनेकजण तिथे उपचार घेण्यास नाखूश असतात. पण ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल गोरगरीब 50 बालकांसाठी वरदान ठरले आहे. या बालकांवर आज रविवारची सुट्टी असूनही विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. त्यात चिकटलेली जीभ व बोटे, रक्ताची गाठ, फायमोसिस, चरबीची गाठ आदींचा समावेश आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत पार पाडल्या असून त्या यशस्वी होताच पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळत होते.

ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दरदिवशी सुमारे 600 ते 700 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. आज गरीब कुटुंबातील मुलांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजपणे डॉक्टरांनी यशस्वी केल्या. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या 50 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

आज शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे एक दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती.

केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हर्निया, हायड्रोसिल, चरबीची गाठ, फायमोसिस, चिकटलेली बोट, चिटकलेली जीभ, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

केईएमच्याच धर्तीवर आज ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हर्निया, रक्ताची गाठ, चिकटलेली बोटे, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा अवघड शस्त्रक्रिया आज करण्यात आल्या.