ठाण्यात मिंधे गटाच्या गुंडांचा बेसावध शिवसैनिकांवर भ्याड हल्ला, शिंदेंच्या इशाऱ्यावरूनच हल्ला झाल्याचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात असलेल्या किसननगर भागात सोमवारी रात्री मिंधे गटाच्या गुंडांनी शिवसैनिकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात दोन शिवसैनिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी निष्ठावंतांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी शिंदेंच्या इशाऱ्यावरूनच हल्ला झाल्याचा आरोप शिवसैनिकांचा केला.

ठाण्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, दौरे धडाक्यात सुरू असल्याने मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातच सोमवारी किसननगर येथील भटवाडी परिसरात नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा समन्वयक मधुकर देशमुख, प्रवक्ते चिंतामणी कारखानिस आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी मिंधे गटाच्या 150 ते 160 गुंडांनी शिवसैनिकांवर हल्ला चढवला. या घटनेत दोन शिवसैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिली. या प्रकारानंतर उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.