ठाणे-घोडबंदर एलिव्हेटेड रोड, बोरिवली ते ठाणे अवघ्या दहा मिनिटांत

3565

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबर वेगवान वाहतूक व प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आले असून ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. त्याशिवाय ठाणे ते घोडबंदर असा 700 कोटी रुपये खर्च करून एलिव्हेटेड मार्गाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

राज्यातील रस्ते जोडणी, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे खाडीवरील तिसरा पूल, कल्याण- शीळफाटा रस्ता, शीव-पनवेल महामार्गावरील भविष्यातील योजनाची व सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दहा किमीचा बोगदा

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदरमार्गे जाण्यासाठी एक- दोन तास लागतात, पण या ठिकाणी भुयारी मार्ग केला तर दहा मिनिटांत ठाणे-बोरिवली अंतर पार करता येईल. या प्रकल्पात दहा किमीचा बोगदा आहे आणि त्यामध्ये एक किमीचा जोडरस्ताही आहे. ठाण्यातील टिकुजिनीवाडीहून बोरिवलीला येईल. त्यामुळे मुंबई-ठाणे हे अंतर जवळ येईल तसेच इंधन, वेळेची बचत व प्रदूषणाला आळा बसेल. या प्रकल्पासाठी वन खात्याकडे परवानगीचा प्रस्ताव सादर केला आहे.

एलिव्हेटेड रोड

ठाण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी ठाणे-घोडबंदर हा एलिव्हेटेड रोड तयार करण्याची योजना आहे. सुमारे 700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. वन विभागाच्या जमिनी आपल्या ताब्यात आल्यावर काम सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

द्रुतगती महामार्गावर बोगदा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन्हीकडे मिळून दहा पदरी रस्ता आहे, पण घाटात चार पदरी रस्ता असल्याने वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिटय़ूपर्यंत बोगदा बांधण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात सुमारे साडेदहा किमीचे दोन बोगदे तयार होतील. त्याच चार मार्गिका येण्यासाठी, चार मार्गिका जाण्यासाठी व एक मार्गिका आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवली जाईल. यामध्ये लोणावळा लेकखालून 150 किमी खालून मार्ग जाणार आहे. एक ते सवा वर्षात टनेलचे काम पूर्ण होईल. सुमारे 6 हजार 700 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर अधिक कमी होईल.

समृद्धी महामार्गावर  ताशी 150 किमी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची माहिती देताना ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 8 हजार 311 हेक्टर जमीन संपादित केली आहे. या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत त्यांच्या जमिनीचे पैसे आरटीजीएमच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होतील. जमिनीच्या करारनाम्यावर मंत्री म्हणून मी स्वतः सह्या केल्या आहेत. या रस्त्याचे काम 18 ते 20 टक्के झाले आहे. 2022 पूर्वी समृद्धी महामार्ग तयार होईल. ताशी 150 किमी वेगाने वाहने धावतील अशा प्रकारचे रस्त्याचे डिझाईन केले आहे. मुंबई-नागपूर अंतर सध्या 15 तासांचे आहे, पण रस्ता पूर्ण झाल्यावर हे अंतर 5 ते 6 तासांवर येईल. यामुळे राज्यातील 14 जिल्हे मुंबईशी जोडले जातील, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

वर्सोवा-विरार सुस्साट

पश्चिम उपनगरात वेगाने जाण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सी लिंकचे काम सुरू होईल. पण त्याचा पुढचा टप्पा वर्सोवा ते विरार प्रस्तावित आहे. डीपीआर पातळीवर प्रकल्प आहे.

शीव-पनवेल टनेल

शीव-पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी लक्षात घेऊन त्यासाठी तुर्भे ते खारघर एक टनेलच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या