
राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणूकीची धामधूम सुरू असतानाच ठाणे शहरात एका दुचाकीच्या डिक्कीत जिवंत हँडग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यात एका महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या बाईकच्या डिक्कीत जिवंत हँडग्रेनेड सापडले. सध्या पोलीस या प्रकरणी आरोपीची कसून चौकशी करत आहे. दरम्यान आरोपीचा घातपात घडवण्याचा प्लॅन होता का अशी चर्चा सध्या होत आहे.
दिव्यातील साबेगाव येथे राहणाऱ्या शिवशंकर राममुरत विश्वकर्मा या व्यक्तीला महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दिव्यातून ताब्यात घेतले होती. तपासादरम्यान त्याच्या बाईकमधून पोलिसांना जिवंत हॅण्ड ग्रेनेड सापडले. बॉम्बशोधक पथकाने तत्काळ ते हँडग्रेनेड निकामी केले व विश्वकर्मा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यात स्फोट घडवून आणण्यासाठी व मानवी जिवीतास हाणी पोहचवण्यासाठी हँडग्रेनेड बाळगल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.


































































