ठाणे जिल्ह्यात दिव्यांग कर्मचाऱ्यास निवडणुकीचे काम नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कुबडय़ा घ्या…व्हीलचेअरवरून या, कसेही या मात्र निवडणुकीचे काम केलेच पाहिजे, अशी बेजबाबदार वक्तव्ये दिव्यांग कर्मचाऱयांच्या बाबतीत काही निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी केली होती. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होताच प्रशासन हडबडले. यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकाही दिव्यांग कर्मचाऱयास निवडणुकीचे काम देऊ नये, दिले असल्यास ऑर्डर रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिले आहेत.

 शासकीय नोकरीत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक काम देऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र हे आदेश ठाणे जिल्ह्यात धाब्यावर बसवले होते. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 70 दिव्यांग कर्मचाऱयांना निवडणूक कामासाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली असता, अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल न घेता मतदान आणि मतमोजणी अशी वर्गवारी करून कर्मचाऱयांना निवडणूक कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

आदेश डावलल्यास कारवाईचा इशारा दिला होता. या अन्यायाची कैफियत दिव्यांग कर्मचाऱयांनी दैनिक ‘सामना’कडे मांडली होती. याबाबतचे वृत्त 29 सप्टेंबर रोजी दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होताच प्रशासन हडबडले. यानंतर तातडीने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले. यामुळे दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.