हॉटेल ‘विहंग इन ‘मध्ये डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचाऱ्यांची राहण्याची मोफत व्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही संकटात धावून जाण्याची परंपरा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कायम ठेवली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच आरोग्य विभागातील व्यक्ती यांना राहण्यासाठी ‘ हॉटेल विहंग इन’ विनामूल्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोरोनाशी लढा संपेपर्यंत आरोग्य विभागाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार सरनाईक यांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या युद्धजन्य परिस्थितीत कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स तसेच एकूणच आरोग्य विभागाचे नियोजन पाहणारे अधिकारी खऱ्या अर्थांने देवदूत म्हणून काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या तसेच आरोग्य खात्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची राहण्याची सोय व्हावी म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःचे हॉटेल प्रशासनाला वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडबंदर रोडवर ‘विहंग इन’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तीन बँक्वेट हॉल व राहण्याच्या 32 रूम आहेत. जोपर्यंत ‘कोरोना’ विषाणू पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आरोग्य खाते काम करीत राहणार आहे. गरज असेल तोपर्यंत आपले हॉटेल आपण त्यांना देत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मीरा – भाईंदर शहरातही आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसात विविध उपक्रम राबवले आहेत. ‘लॉक डाउन’च्या काळात एकही दिवस घरी न बसता सतत लोकांच्या मदतीसाठी ते सक्रिय आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला जे सहकार्य लागेल ते सगळे केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.