
विनित जांगळे, ठाणे
कोरम मॉलमधून निघून हॉटेल सत्कार रेसिडेन्सीचा पाहुणचार झोडल्यानंतर जेरबंद झालेल्या ‘त्या’ बिबट्याचे आज नामकरण करण्यात आले. जंगलातून माणसात आलेल्या बिबट्याचे या हॉटेलच्याच नावावरून ‘सत्कार’ असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बारसे केले. मायक्रोचिप बसवलेल्या बिबट्याला जंगलात सोडले जाणार असून या चिपच्या युनिक आयडीवरून ओळख कागदोपत्री होणार आहे. मात्र दैनंदिन परवलीचा शब्द म्हणून त्याला ‘सत्कार’ या नावाने ओळखले जाणार आहे.
ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये बुधवारी पहाटे बिबट्या शिरला. तेथून बाहेर पडलेल्या बिबट्याने थेट हॉटेल ‘सत्कार’ रेसिडेन्सीमध्ये आश्रय घेतला. यावेळी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करून त्याला सहा तासांनंतर जेरबंद केले. त्यानंतर त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्यात आली. यावेळी उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी या बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी केली असून हा बिबटय़ा पाच ते सहा वर्षांचा नर आहे. तंदुरुस्त असलेल्या या बिबटय़ाची पूर्ण वाढ झाली असून याआधी हा बिबटय़ा वनविभागाच्या संपर्कात न आल्याने त्याला मायक्रोचिप बसवण्यात आली नक्हती. मात्र आता त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसवली असून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.
सीसीटीव्हीवरून काढणार माग
‘सत्कार’ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलातूनच कोरम मॉलपर्यंत आल्याचे तूर्तास वनविभागाने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही त्याने नेमक्या कोणत्या भागातून येत कोरम मॉल गाठला, किती दिवस त्याने हा चार किलोमीटरचा प्रवास केला, या काळात तो कोठे लपला, याबाबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अधिक खुलासा होणार आहे. त्यातून भविष्यात नवीन ‘सत्कार’ जंगल सोडून मानवी वस्तीत शिरू नये यासाठी उपाययोजना करणे, सुकर होणार आहे.
वैद्यकीय अहकालानंतर ‘बॅक टू होम’
‘सत्कार’ या बिबटय़ाला तूर्तास कोणतीही जखम झालेली नाही. मात्र त्याच्या प्रकृतीबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय अहवालाचे पत्र मिळताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे ठाणे प्रादेशिक वनविभागाचे उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

























































