
एखादी घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी लाखो रुपये खर्चून १ हजार 598 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. हे कॅमेरे पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त ठरले असून तपासाचा योग्य ‘अँगल’ही मिळाला आहे. चार वर्षांत पोलिसांनी 1 हजार 48 फुटेज तपासले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.
ठाणे शहरातील रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठ, जांभळी नाका, कोपरी, तलावपाळी, द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड, माजिवडा नाका, वर्तकनगर, मुंब्रा, कळवा या भागांत महापालिकेने 2017 पासून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली. त्यासाठी नगरसेवक व प्रभाग समिती निधी वापरला. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात दीड हजारांहून अधिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तर वायफायच्या माध्यमातूनदेखील 250 कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी लावले.
55 कॅमेऱ्यांची तोडफोड
शहरात लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी आतापर्यंत 55च्या आसपास कॅमेरे काही विघ्नसंतुष्ट नागरिकांनी दगड मारून फोडली आहेत. एका ठिकाणी लावलेल्या तीन कॅमेऱ्यांपैकी दोन कॅमेऱ्यांची नासधूश करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांकडे महपालिकेने तक्रारही केली होती. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वायर ब्रेकडाऊन
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात बसवलेल्या एकूण कॅमेऱ्यांपैकी 8 ते 10 कॅमेरे हे तांत्रिक बिघाडामुळे बंद असतात. यामध्ये प्रामुख्याने विद्युत कनेक्शन, वायर ब्रेक होणे यांसारखी कारणे आहेत. महिलांची सुरक्षा करण्याबरोबरच सोनसाखळी चोरी, अपघात, आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे काम करत आहेत. तर मागील चार वर्षांत १ हजार 048 फुटेज तपासून पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा लावला. ठाण्यासह नवी मुंबई, मीरा रोड आदी पोलिसांनी ठाणे महापालिकेकडून सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यामुळे महापालिकेचे लावलेले फुटेज दूरवरदेखील उपयुक्त ठरले असल्याचे दिसून आले आहे.




























































