
विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून 42 लाखांची वीजचोरी करणाऱ्या दोघांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराम शेट्टी व शैलेश डेढिया अशी त्यांची नावे आहेत. या वीज चोरांनी मागील दोन वर्षांत रिमोट सर्किटच्या मदतीने 1 लाखाहून अधिक युनिटचा वापर करत महावितरणची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
कोलशेत परिसरातील ‘द रेकडी’ हॉटेलच्या मीटर रीडिंग डेटामध्ये अनियमितता दिसून आली. याबाबत भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी कोलशेत उपविभागाला मीटर तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागातील सहाय्यक अभियंता विठ्ठल माने, फॉरमन किरण दंडवते व प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बने यांनी हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड केल्याचे दिसले. सखोल तपास केला असता ग्राहकाने रिमोट सर्किट लावून वीजचोरी केल्याचे निष्पन्न होताच पथकाने ग्राहक शिवराम शेट्टी व विद्युत वापरकर्ता शैलेश डेढियाविरोधात गुन्हा दाखल केला.
वीजचोरी हा फौजदारी गुन्हा असून ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा. अनधिकृत वीज वापरल्यास याचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. महावितरणची वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे व यापुढे अशी वीजचोरी आढळ्यास वीज चोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ



























































