
जरीमरी मातेच्या पालखी मिरवणुकीत झालेला वाद विकोपाला जाऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गोकुळनगरमधील हनुमान मंदिर परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे यावेळी एका माथेफिरू तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणांवर विळ्याने हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी राबोडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोज घडणाऱ्या या गुंडगिरीमुळे ठाणे पोलिसांचा दरारा संपल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
कपिल कुंभार, मयूर सरकार, साहिल धायबर हे तिघेही लाल मैदानाच्या बाजूला असलेल्या धर्मवीर कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. यावेळी त्याच परिसरात राहणारे यश मोरे, साहिल सावंत, गणेश शेलार व शिरीष कांबळे हे चौघे तेथे आले. त्यांनी मिरवणूक संपल्यानंतर मारामारी करायला आला होता का, असा जाब विचारत तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. यावेळी कपिल व त्याच्या मित्रांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या चौघांनी त्यांना लाकडी फळी व घरगुती विळ्याने मारहाण करून जखमी केले.