
ठाण्यातील खड्ड्यांनी आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे. गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना असून दिव्यात खड्डे चुकवत वाट काढणाऱ्या दुचाकीस्वाराचा पाण्याच्या टँकर खाली येऊन मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवा-आगासन रोडवर ही घटना घडली असून याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकीवरून जाताना दिसतोय. त्याचवेळी खड्ड्यांमुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि तो पडतो. याचवेळी समोरून येणाऱ्या टँकरच्या मागील चाकाखाली हा तरुण सापडतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. ही घटना काल (28 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी या अपघाताबाबत माहिती दिली. दिवा टाउनशिपमधील दिवा-आगासन रोडवर हा अपघात झाला असून गणेश फाले असे मृताचे नाव आहे. गणेश फाले स्कूटीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली आला. अपघातानंतर त्याला तत्काळ कळवा नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मुंब्रा पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे – अवघ्या चार दिवसात खड्ड्यांमुळे दुसऱ्या तरुणाचा बळी, दिव्यात खड्डे चुकवत वाट काढणाऱ्या दुचाकीस्वाराचा टँकर खाली येऊन मृत्यू #ViralVideo pic.twitter.com/Qa8TZUvGlg
— Saamana (@SaamanaOnline) August 29, 2022
दरम्यान, हा प्रकार इतक्या झटपट घडतो की ट्रक चालकालाही याचा पत्ता लागत नाही. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरील लोक टँकर चालकाचे लक्ष वेधतात आणि त्याला टँकर थांबवण्यास लावतात. विशेष म्हणजे ठाण्यातील खड्ड्यांनी घेतलेला हा पहिलाच बळी नसून याआधीही अनेकदा असा प्रकार घडला आहे.



























































