चढ्या भावाने माल विकल्यास दुकानदारांवर कारवाई, ठाणे महापौर नरेश म्हस्के यांचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश हा लॉकडाऊन झाला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र ठाणे शहरातील काही दुकानदार आपल्या जवळील माल अव्वाच्या सव्वा भावाने विकून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या शिवसेना शाखेशी तसेच आपल्या स्थानिक नगरसेवकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधावा असे सांगत दुकानदारांनी नागरिकांच्या परिस्थीतीशी खेळू नये असे आवाहन वजा इशारा महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

सध्या सर्वत्र बंदीचे वातावरण जरी असले तरी जीवनावश्यक मालाची आवक सुरू आहे. मात्र काही दुकानदार हे मालाची साठेबाजी करीत आहे, नागरिकांना वाजवीपेक्षा दुप्पट तिप्पट दराने आपल्या जवळील माल विकत असल्‌याच्या तक्रारी नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत ठाणे शहरातील दुकानदारांनी नागरिकांची फसवणूक करु नये, आहे त्याच किमंतीला आपल्याकडील माल विकावा असे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले आहे. जर कोणी दुकानदार अशाप्रकारे नागरिकांची फसवूणक करीत असेल तर नागरिकांनी आपल्या नजीकच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधावा तसेच नगरसेवकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून संबंधित दुकानदाराची माहिती द्यावी जेणेकरुन अशा दुकानदारांवर पोलीसांमार्फत कारवाई करणे शक्य होईल असेही महापौरांनी नमूद केले आहे. जर नागरिकांकडून दुकानदारांबाबत शिवसेना शाखेत अथवा स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या तर नाईलाजाने दुकानदारांवर कारवाई करावी लागेल असा इशाराही महापौर नरेश म्हस्के यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या