मला दाऊद इब्राहिम टोळीकडून धमकीचा फोन आला – ठाणे महापौर 

3431

ठाणे शहराच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी उशिरा रात्री एका अज्ञात इसमाने धमकी देणारा फोन केला आहे. या इसमाने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मित्र असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यांना एका हिंदुस्थानात नोंदणी झालेल्या नंबरवरून फोन आला असून फोन करून धमकी देणारा व्यक्ती हा डी-गँगचा सदस्य असल्याचे त्याने मीनाक्षी यांना सांगितले आहे. तसेच ‘ठाण्यात कुणाशी पंगा घेऊ नका. जर तुम्ही असं करण्यास नकार दिला, तर तुमचे अपहरण करून तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करू’, अशी धमकी त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी तक्रारीत नोंदवले आहे.

दाऊदच्या गुंडांनी एका महिलेला धमकावण्याची हिंदुस्थानात ही पहिलीच घटना घडली आहे. ‘पुरुषार्थ संपत चालल्याचे दिसत आहे, म्हणून एका महिलेला धमकी दिली जात आहे’, असे शिंदे म्हणाल्या आहेत. त्यांनी फोनवर धमकी देणाऱ्या गुंडाला आव्हान दिले आहे की, मी कुणाला घाबरत नाही. हिंमत असेल तर समोर येऊन धमकी द्यावी, असेही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याप्रकरणाची चर्चा केल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

‘आम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि निवडणुकीच्या काळात ही तक्रार नोंदविण्याची गरज आहे’, असे शिंदे म्हणाल्या आहेत. याप्रकरणी ठाण्यातील कापुरबावडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या