
ठाणे-मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो-4 प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 प्रकल्प हा लोकहिताचा असून या प्रकल्पामुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी नवीन पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आज मेट्रोआड येणारी 36 झाडे तोडण्यास परवानगी दिली. ही परवानगी देतानाच 913 झाडांचे काळजीपूर्वक पुनर्रोपण करा, तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचनाही एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला केल्या.
ठाण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी तसेच इतर विविध 18 विकासकामांकरिता सुमारे 3800 झाडे तोडण्यात येणार आहेत. याविरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी रोहित जोशी तसेच ठाणे नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने झाडे तोडण्यावरील स्थगिती उठवत एमएमआरडीएला दिलासा दिला.
याचिककर्त्यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या ऍड. गायत्री सिंग यांनीही त्यास होकार दर्शवला. त्यानंतर हायकोर्टाने 18 पैकी सहा विकासकामांना वृक्षतोडीसाठी परवानगी दिली त्याचबरोबर इतर खासगी प्रकल्पासाठी 2012 झाडे तोडण्याच्या परवानगीवर मात्र स्थगिती कायम ठेवली.
वृक्षतोडीबाबतची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर
ठाणे पालिकेची बाजू मांडणारे वकील एस. एम. गोरवाडकर यांनी कोर्टाला सांगितले की, वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेल्या परवानगीबाबत याचिकाकर्त्याना माहिती दिली असून पालिकेच्या संकेतस्थळावरही वृक्षतोडीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रस्ता रुंदीकरण, जिल्हा न्यायालयाचे काम मार्गी
सुनावणीवेळी पालिकेचे ऍड. गोरवाडकर यांनी रस्ता रुंदीकरण तसेच जिल्हा न्यायालयाच्या विकासकामांसाठी अडसर ठरणारी झाडे तोडण्याबाबत खंडपीठासमोर परवानगी मागितली. हायकोर्टाने त्यालाही मंजुरी दिली. त्यानुसार ठाणे पालिका 101 झाडे तोडणार असून 664 झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. 101 पैकी 77 झाडे ही ठाणे-कळव्यातील रस्ता रुंदीकरण आणि इतर चार रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तोडण्यात येणार आहेत.





























































