
सामना प्रतिनिधी। ठाणे
श्री मावळी मंडळ ठाणे आयोजीत 94 व्या शिवजयंती उत्सवानिमित्त 68 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटातील अंतिम विजेतेपद चेंबूर क्रीडा केंद्र (मुंबई उपनगर) या संघाने तर महिला गटात शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर या संघाने सलग सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवले. पुरुष गटातील अंतिम विजेतेपदाच्या लढतीत मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ संघावर अतिशय रोमहर्षक लढतीत 32-29 अशी 3 गुणांनी मात करून अंतिम विजेतेपद मिळवले.
महिला गटातील अंतिम सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळावर 36-28 असा 8 गुणांनी विजय मिळवला. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ कल्पना राईलकर (संचालक – ठाणे जनता बँक.),. अजित रानडे (सहायक महाव्यवस्थापक – ठाणे जनता बँक) यांच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून निरंजन डावखरे (आमदार), रामनाथ मोटे, देवराम भोईर (नगरसेवक व अध्यक्ष – ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), प्राजक्ता राऊत (उपशिक्षण अधिकारी), अनंत तरे (शिवसेना उपनेते) व संजय भोईर (माजी विरोधी पक्षनेते ठा. म. पा. ) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मिलिंद यादव, केशव मुकणे, विश्वस्त सुरेश म्हात्रे, जोसेफ फेर्नांडिस, प्रभाकर सुर्वे उपस्थित होते.
मिर्ची ग्रुप आणि गणेश गल्ली मित्रपरिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या गणेश गल्ली प्रीमियर लीग स्पर्धेम मधू इलेव्हन संघाने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. मुंबईचा राजा वॉरियर याने दुसरा, तर गणेश गल्ली योद्धा याने तिसरा क्रमांक पटकावला. हर्ष राणे मालिकावीर, अंकित सत्या सर्वोत्तम फलंदाज, तर अभिजित कांबळी सर्वोत्तम गोलंदाज ठरला. शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष, शाखाप्रमुख किरण तावडे, उपशाखाप्रमुख धीरज जैन, किरण परब, समाजसेवक दत्ता बनकर, ज्येष्ठ शिवसैनिक नंदकुमार बागवे आणि मान्यवर उपस्थित होते.



























































