
25 लाख रुपयांचा निधी खर्च करून तयार केलेला रस्ता सहा महिन्यांत पूर्णपणे उखडल्याचा प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत साजगाव गावकऱ्यांनी आवाज उठवूनही जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कागद ‘रंगवून’ लाखो रुपयांची अफरातफर करणाऱ्या ठेकेदारासह सरकारी बाबूंच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
मुरबाड-माळशेज महामार्गालगत साजगाव हे गाव असून येथील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना साधा रस्ता नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. याविरोधात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. इतकेच नाही तर निविदा काढून सहा महिन्यांपूर्वी या दीड कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु काही दिवसांतच हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गावकऱयांना चालताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यातून बाहेर आलेल्या खडीमुळे गावकऱ्यांना चालताना नकोसे होते. त्यामुळे जुनीच पायवाट बरी होती, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे या निकृष्ट कामाच्या अनेकदा तक्रारी करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत.
फौजदारी गुन्हे दाखल करा!
रस्त्याचा ठेकेदार दीपक पवार हे पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे काम करताना शाखा अभियंत्यांसह सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सतीश घरत यांनी केला आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

























































