
जानेवारी महिन्यातच तिने आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली. सुखी संसाराची स्वप्ने दोघेही बघत होते, पण फक्त नऊ महिन्यातच त्यांच्या संसाराची स्वप्ने घोडबंदरच्या खड्ड्यांनी चिरडली. सोमवारी रात्री उशिरा घोडबंदरच्या वाघबीळ उड्डाणपुलावरून दुचाकीने घरी जाणाऱ्या आरती मिश्रा हिची स्कुटी खड्यात आदळली आणि ती कोसळली. इतक्यात मागून आलेल्या कंटेनरने धडक दिली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वय अवघे २७ होते. या अपघातामुळे मिश्रा कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली असून घोडबंदर रोडवरील खड्डे आणखी किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे.
लग्नानंतर आरती ही आपल्या पतीबरोबर ओवळा येथे राहत होती. आपल्या संसारात काही कमी पडू नये यासाठी ती नोकरीही करायची. एवढेच नव्हे तर तिने छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकानाचा गाळादेखील घेतला होता. तसेच कामावर जाण्याकरिता नवी कोरी दुचाकीदेखील विकत घेतली. सारे काही ठिकठाक सुरू होते, पण काळाला ते मान्य नव्हते. खासगी कंपनीत काम करणारी आरती सोमवारी रात्री दुचाकीवरून घरी जात असताना वाघबीळ उड्डाणपुलावर खड्ड्यांनी घात केला आणि तिची गाडी नियंत्रण सुटून खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने तिला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कंटेनरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.
… आणि पतीने हंबरडा फोडला
रोज रात्री उशिरापर्यंत आरतीचे कुटुंब तिची वाट बघायचे. सोमवारीदेखील ती ठराविक वेळेला येईल असे वाटत होते, पण बराच वेळ झाला तरी आरतीचा पत्ता नव्हता. नेमके काय झाले हे समजेना. अखेर रात्री उशिरा येऊन धडकली ती थेट तिच्या अपघाती मृत्यूची बातमी. ती समजताच आरतीच्या पतीने अक्षरशः हंबरडा फोडला.
ठाकुर्लीत बेफिकीर चालकामुळे महिला जखमी
डोंबिवली- ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवणाऱ्या एका १९ वर्षीय शाळकरी मुलाने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जयश्री बोढाळे असे जखमी महिलेचे नाव असून तिच्या पायाचे हाड मोडले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात देसलेपाडा येथे राहणाऱ्या दिव्येश परब याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्येशकडे वाहन चाल विण्याचा परवानाही नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

























































