
बर्फाच्या दरात दीड महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करणारे पुरवठादार आता मच्छीमारांच्या दणक्यानंतर गारठले आहेत. त्यांनी टनामागे केलेली ८५ रुपयांची दरवाढ मागे घेऊन ती ६५ रुपयांवर आणली आहे. ही नवीन दरवाढ येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार असून १ जून २०२६ पर्यंत बर्फाच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही असे ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि मच्छीमार संस्थांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर बर्फ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी महागाई, मजुरी, मीठ, अमोनिया यांच्या किमती वाढल्याने बर्फाच्या प्रतिटनामागे तब्बल ८० रुपयांची वाढ केली होती. यामुळे बर्फाचे भाव प्रतिटन २३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आता पुन्हा ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने वीज दरवाढीचे कारण पुढे करत प्रतिटनामागे आणखी ८५ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे मच्छीमार व मच्छीमार संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या दरवाढीचा मच्छीमारांनी जोरदार विरोध केला होता. दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक आज वाशी येथील मर्चेंट जिमखान्यात पार पडली.
ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष रसिक देसाई, अन्य पदाधिकारी तसेच करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, चंद्रकांत कोळी, नारायण नाखवा, अमोल रोगे, बर्फ सप्लायर्स आणि विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत बर्फाच्या दरवाढीवर घमासान चर्चा झाली. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन बर्फाच्या दरात ८५ रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावावर ठाम होती. अखेर दोन्ही बाजूच्या प्रदीर्घ चर्चेनंतर बर्फाच्या प्रतिटनामागे ६५ रुपये वाढीचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला.
बर्फाची प्रतिटनामागे करण्यात आलेली ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. येत्या १ जूनपर्यंत तरी कोणत्याही कारणाने दरवाढ न करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.