डोंबिवलीतील बेकायदा समर्थ कॉम्प्लेक्सवर 6 मार्चला ‘हातोडा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयरेगाव टावरीपाडा परिसरातील सात मजली समर्थ कॉम्प्लेक्स इमारत आता महापालिकेच्या रडारवर आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या बेकायदा इमारतीवर येत्या 6 मार्चला हातोडा पडणार आहे. इमारत जमीनदोस्त करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी नोटिसा बजावत इमारत अनधिकृत घोषित करत भूमाफियांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र या कारवाईला भूमाफियांनी न जुमानता इमारतीचे काम पूर्ण केले. सध्या या इमारतीत 60 कुटुंबे राहात आहेत. या रहिवाशांना दिलासा देण्याबाबत न्यायालयात मागणी केली होती मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली होती.

न्यायालयात याचिका ‘समर्थ’ इमारतीचे काम सुरू असलेल्या जमिनीचे वारसदार बबन केणे यांनी मालकी हक्कातून नाव वगळल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका कर्मचारी दोन वेळा या इमारतीवर कारवाईसाठी गेले होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि रहिवाशांच्या विरोधामुळे कारवाई झालीच नाही.