कळवा कारशेड आमच्या मामाची, एकही लोकल नाही कामाची; कारशेडमधून लोकल पकडताना कळवावासीयांचा जीवाशी खेळ

कळव्यातील दीड लाख रेल्वे प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कर्जत, कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकल ट्रेन भरभरून येत असल्याने कळव्यातील चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडता येत नाही. त्यामुळे कारशेडमधून लोकल पकडताना कळवावासीयांचा अक्षरशः जीवाशी खेळ सुरू असून ‘कळवा कारशेड आमच्या मामाची, एकही लोकल नाही कामाची’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. दरम्यान, कळवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

चाळीस वर्षापासूनची मागणी

कळवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेनची सुमारे चाळीस वर्षांपासूनची मागणी आहे. त्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने याआधी अनेक आंदोलने केली आहेत. १९८९ साली शिवसेना खासदार, आमदार व धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा रेल्वे स्थानक परिसरात आंदोलनदेखील करण्यात आले होते. आता तरी केंद्र सरकार या मागणीकडे लक्ष घालणार का, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

लोकल सुरू व्हावी यासाठी सह्यांची मोहीम राबविली जात आहे. यातून काहीच निष्पन्न झाले नाही तर एक दिवस उग्र आंदोलन सुरू होईल. याप्रकरणी अनेक वेळा तक्रार, पत्र, सूचना, भेटी या मार्गान रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले जाते. बुधवारी कळवा पूर्व येथे पुन्हा सह्यांची मोहीम राबविली गेली. यावेळी तीन हजार नागरिकांनी सह्या करून शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

विजय देसाई, उपजिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा

दररोज सकाळी आठच्या सुमारास कळवा कारशेड लोकल ट्रेन सिग्नलला थांबते. ही लोकल ट्रेन काही मिनिटात फुल्ल होते. कारशेडमधून लोकल पकडताना महिलावर्गाची चांगलीच कसरत होत असून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. प्रवाशांचे दररोजचे होणारे हाल संपावेत.

कोमल निर्जेकर, महिला प्रवासी

कळवा शहरातील रेल्वे प्रवाशांना लोकलच्या नाही. कळवा स्थानकात पौक अवर्सच्या वेळेत प्रवाशांची प्रचंड झुंबड उडत असल्याने ट्रेनमध्ये शिरताना नाकीनऊ येत आहे. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांचा जीवदेखील गेला असून मुंबई दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रॅकवरून चालत ठाणे गाठून लोकल पकडावी लागत आहे. त्याकरिता वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे.

सुदेश दरेकर, प्रवासी