
चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून आधी ठाकरे ब्रॅण्ड काढा, मग तुमचा कसा बॅण्ड वाजेल तो बघा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मिंध्यांना सुनावले आहे. ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांच्याबद्दल बोलताना थोडे तरी तारतम्य बाळगा, पण सध्या चुकीची माणसे सत्तेत असून आजच्या लोकशाहीचे हे दुर्दैव असल्याचेही दिघे यांनी म्हटले आहे.
केदार दिघे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले आहे की, सध्या देशासह राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला जात आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये तर सगळे चोर दिसत आहेत. कुणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतंय, कुणी पक्ष चोरत आहे. त्यामुळे राजकारणाचा चोरबाजार झाला आहे. नुकत्याच झालेल्या बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडून मते विकत घेणाऱ्या मिंध्यांनी ठाकरे बॅण्डवरून अकलेचे तारे तोडले, पण ज्या बॅण्डमुळे तुम्हाला ओळख मिळाली, पदे मिळाली, संपत्ती मिळाली त्या ठाकरे बॅण्डचे नाव घेऊन मिंधे खालच्या पातळीवरचे राजकारण करत असल्याचा आरोप केदार दिघे यांनी केला आहे.
एक्स पोस्टवर काय?
तुम्ही चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून ठाकरे ब्रॅण्ड काढा, मग तुमचा बॅण्ड कसा वाजेल तो बघा… उपमुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने किमान आपण ज्यांच्यामुळे घडलो त्यांच्याबाबत बोलताना तारतम्य बाळगायला हवे, पण आज लोकशाहीचे दुर्दैव आहे, चुकीची माणसे सत्तेत आहेत अशा शब्दात दिघे यांनी मिंधेंना ठणकावले. केदार दिघे यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे.