बदलापूरचे झाले अंधारपूर’, तांत्रिक बिघाडामुळे 7 तास वीज गुल

electricity-1

रविवारी रात्री बदलापूरचे अक्षरशः ‘अंधारपूर’ झाले. अंबरनाथ एमआयडीसीतील वीज वाहिनी तुटल्याने बदलापूरकरांना सात तास अंधारात राहवे लागले. याबाबत तक्रारी करूनही महावितरणाकडून वारंवार वीज वाहिनी तुटल्याचे कारण सांगितले जात असल्याने ग्रामस्थांचा चांगलाच घामटा निघाला. रविवारी रात्री 12 वाजता बत्तीगुल झाली ती सकाळी 7 वाजता आली. वीज नसल्याने रात्रभर बदलापूरकरांना डासांनी फोडून काढले. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

आग ओकणारा सूर्य आणि गरम वाफा अशा भट्टीत बदलापूरकर सध्या उकळून निघत आहेत. त्यातच रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील वीजपुरवठा बंद झाला. बराच वेळ उलटूनही वीज न आल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालय आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मोरिवली अंबरनाथ सब स्टेशन येथे टॉवर लाईनचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच तास लागतील, अशी माहिती बदलापूर पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांनी दिली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करत सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

सुटकेचा निःश्वास

बत्तीगुल झाल्याने लहान, मुले वृद्ध, महिला व घरून काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी कात्रपमधील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. सात तासांनंतर वीजपुरवठा महावितरणने सुरळीत केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.