
भिंवडीत संतापजनक घटना समोर आली आहे. शौचासाठी घराबाहेर गेलेल्या सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजाऱ्याने बलात्कार करून तिची हत्या केली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सलमानत अली अंसारी असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षीय मुलगी रविवारी दुपारी 3 वाजता शौचासाठी घराबाहेर गेली ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. यादरम्यान शेजारच्या घराला कुलूप पाहून मुलीच्या पालकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता शोचाला घेऊन गेलेली बादली आत दिसली. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी कुलूप तोडून आत घुसले.
शेजाऱ्याच्या खोलीत एका गोणीत मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपी आधीच एका बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात ठाण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत होता. 4 ऑगस्ट 2024 रोजी त्याने पोलिसांना चकवा देत पलायन केले. त्यानंतर तो भिवंडीत लपून बसला होता.