
नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ऐरोलीत शिंदे गटाचे मनोज हळदणकर यांनी दादागिरी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक ४ अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या घरासमोर हळदणकर यांनी शिलाई मशीन आणून ठेवली. निवडणुकीत पराभव झाला, आता कार्यालय बंद करा आणि शिलाई मशीन चालवा, अशी अरेरावीची भाषा यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी करून त्यांच्या घरासमोर गोंधळ घातला.
नंदा काटे या २०१५ च्या निवडणुकीत ऐरोलीतून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवली. याच प्रभागातून शिंदे गटाने हळदणकर यांना उतरवले होते. हळदणकर निवडूनही आले. मात्र नंदा काटे यांना ३ हजार ७८५ इतकी मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
शिवसेना उमेदवाराला इतका मोठा जनाधार मिळाल्यामुळे सैरभैर झालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मिरवणूक काढून काटे यांच्या घर आणि कार्यालयासमोर गोंधळ घातला. एका खुर्चीवर शिलाई मशीन ठेवून तिला हार घातला. याप्रकरणी काटे यांनी आज रबाळे पोलिसांकडे तक्रार केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आदी उपस्थित होते.






























































