कवितेवर टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची तीन वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांना धक्का बसला

कवितेवर टाळ्या वाजवल्या नाही म्हणून एका शिक्षिकेने तीन वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या मारकुट्या शिक्षिकेचा अमानुषपणा तेथेच असलेल्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ व्हायरल होताच पालकांना धक्का बसला आहे. याबाबत मुलाच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे.

उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४ मध्ये गुरुनानक चौकाजवळ एक्सिलंट कीड्स वर्ल्ड नावाची पूर्व प्राथमिक विभागाची इंग्रजी शाळा आहे. या शाळेतील शिक्षिका मुलांना कविता शिकवत होती. मात्र एका तीन वर्षांच्या मुलाने कवितेवर टाळ्या न वाजवल्याने या शिक्षिकेचा पारा चढला आणि तिने थेट मुलाला मारहाण सुरू केली. मात्र वेदनेने विव्हळत असलेल्या या चिमुकल्याचीदेखील शिक्षिकेला दया आली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कारवाई करा

चिमुकला लहान असल्याने झालेल्या मारहाणीची माहिती त्याला घरी सांगता आली नाही. मात्र त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीने मारकुट्या शिक्षिकेचा व्हिडीओ मुलाच्या आईला दाखवला. हा व्हिडीओ पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तडक विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांढरे हे तपास करत आहेत. दरम्यान, पालकांनी मारकुट्या शिक्षिकेवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली आहे.