Thane news – घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना चार दिवस ‘नो एण्ट्री’

रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अवजड वाहनांची वाहतूक, दुरुस्तीची कामे यामुळे घोडबंदर रोडची चांगलीच कोंडी झाली आहे. या वाहतूककोंडीमुळे चालकांना रोजच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून पुढील चार दिवस घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना नो एण्ट्री लागू करण्यात आली आहे. गायमुख घाटात डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीत हा मार्ग सर्व अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

मुंबई तसेच ठाणे येथून घोडबंदरला जाणाऱ्या मार्गावरील गायमुख घाटातून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या घाटात डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. 7 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 नंतर घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 8 ऑगस्टपासून सुरू झालेला हा बंद 11 ऑगस्ट सकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल केले आहेत.

या मार्गावर प्रवेश नाही

मुंबई, ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजिवडा येथील वाय जंक्शन, कापूरबावडी जंक्शन, मुंब्रा-कळवा येथून येणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका, नाशिक येथून येणाऱ्या वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सर्व वाहनांनी अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका, मुंबई-वसई-विरार येथून येणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सर्व वाहनांनी चिंचोटी नाकामार्गे इच्छितस्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.