
दिवा शहराची तहान भागावी यासाठी ठाणे पालिकेने २०१२ साली बेतवडे येथे दोन विशाल जलकुंभाची उभारणी केली खरी. मात्र या जलकुंभांच्या माध्यमातून थेट घराघरात पाणी मिळेल असे दिवास्वप्न दाखवणाऱ्या प्रशासनाची पोलखोल झाली आहे. उभारलेल्या जलकुंभातून तब्बल १३ वर्षे उलटून गेली तरी पाणीच न आल्याने हे जलकुंभ धूळ खात पडून आहेत. दिवावासीय आधीच पाणीटंचाईने हैराण असताना दिव्यातील बेतवडे येथील दोन जलकुंभ ‘पांढरा हत्ती’ ठरले आहेत. दरम्यान, प्रकल्पावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्मार्ट सिटी अशी टिमकी वाजवणाऱ्या ठाणे पालिका प्रशासनाने दिव्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने बेतवडे येथे दोन जलकुंभाची उभारणी केली. मात्र हे जलकुंभ अद्याप सुरू झाले नाहीत. एकीकडे दिवा शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना दुसरीकडे हे जलकुंभ केवळ शोभेची वास्तू म्हणून उभे आहेत. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा दाब अत्यंत कमी झाला आहे. ऐन सणासुदीत अनेक वस्त्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी पाठपुरावा केल्याचा दावा केला जातो. मात्र यावर कोणताही सकारात्मक उपाय काढलेला दिसत नाही.
आश्वासन देणारे सत्ताधारी गेले कुठे?
ठाणे महापालिका प्रशासन हे जलकुंभ का सुरू करू शकत नाही, याचे साधे स्पष्टीकरणही देण्यास तयार नाही. या निष्क्रिय कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊ असे वर्षानुवर्षे आश्वासन देणारे सत्ताधारी गेले कुठे? असा सवाल दिवावासीयांनी उपस्थित केला आहे.
प्रमुख मागण्या
- बेतवडे येथील दोन्ही बंद जलकुंभतत्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करावेत.
- दिवा शहरात समान दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा.
- जलकुंभ उभारणीत झालेल्या खर्चाचा अपव्यय का झाला याची चौकशी करावी.
शिवसेना रविवारी प्रशासनाचे श्राद्ध घालणार
शहरातील पाणी समस्येची दाहकता आणि प्रशासनाची उदासीनता यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) येत्या रविवारी बंद जलकुंभांचे ‘श्राद्ध’ घालून आंदोलन करणार आहे. दिवा शहर महिला संघटक ज्योती पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाची माहिती दिली आहे.