विमान वही उडायेंगे, पर तारीख नही बतायेंगे; नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ केव्हा? सिडको सांगेना, अदानीची कंपनी बोलेना!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन या महिनाअखेरपर्यंत होणार असल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनी आणि सिडकोकडून सांगितले जात असले तरी उद्घाटनाची तारीख सांगण्यास मात्र कोणीच तयार नाही. ‘विमान वहीसे उडायेंगे.. पर तारीख नही बतायेंगे’ अशीच भूमिका या दोन्ही संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा महिना संपण्यास फक्त दहा दिवसांचा कालावधी उरलेला असताना उ‌द्घाटनाची अधिकृत तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरचाही मुहूर्त हुकतो की काय, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

नवी मुंबई विमानतळाची घोषणा झाल्यापासून एकही काम वेळेत पूर्ण झालेले नाही हा या प्रकल्पाचा इतिहास आहे. विमानतळाचे उ‌द्घाटन करण्याबाबत सिडको, राज्य सरकार आणि अदानी एअरपोर्ट होल्डिगने दिलेल्या सुमारे अर्धा डझन डेडलाइन हुकल्या आहेत. शेवटची डेडलाइन ही सप्टेंबर महिन्यातील देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी विमानतळाचे उद्घाटन होईल असे तर्क अनेक तज्ज्ञांनी लावले होते. मात्र पंतप्रधानांचा वाढदिवस होऊन दोन दिवस झाले तरी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अदानी समूह आणि सिडकोने जाहीर केलेली नाही.

  • सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन या महिन्याच्या अखेरपर्यंत होईल असे जाहीर केले होते. त्यांनी तारीख सांगण्यास नकार दिला.
  • अदानी एअरपोर्ट होल्डिंगचे सीईओ अरुण बन्सल यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत विमानतळाचे उ‌द्घाटन सप्टेंबरमध्ये होईल असा दावा केला. मात्र त्यांनी कार्यक्रमाची तारीख जाहीर केली नाही.
  • सप्टेंबर महिना संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उद्घाटनाच्या तारखेबाबत सर्वांकडून विचारणा होऊ लागली आहे. तारखेबाबत सिडको आणि अदानी होल्डिंग या दोन्ही संस्थांनी कमालीची गुप्तता पाळल्याने गूढ निर्माण झाले आहे.
  • उद्घाटन जरी या महिन्यात झाले तरी विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी जाहीर केले आहे. मात्र अद्याप उद्घाटनाची तारीख जाहीर होत नसल्याने सप्टेंबरचा मुहूर्तही हुकतो की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

सुविधांचे काम युद्धपातळीवर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह या परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. विमानतळासाठी उलवे परिसरात उड्डाणपुलांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बहुतेक उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. हजारो कामगार या साईटवर दिवसरात्र काम करीत आहेत. विमानतळाच्या अंतर्गत क्षेत्रातील कामेही सध्या वेगात सुरू आहेत.