
रस्ते अपघातात ब्रेन डेड झालेल्या एका ३३ वर्षीय तरुणाने मृत्यूनंतर तब्बल ९ जणांना जीवनदान दिले आहे. या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याचे हृदय, दोन किडनी, लिव्हर, पॅनक्रिया, कॉर्निया, बोन ब्राईज हे शरीराचे अवयव दान केले. ते ग्रीन – कॉरिडॉरद्वारे तत्काळ विविध रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यात आल्याने ९ जण मृत्यूच्या दाढेतून परतले आहेत.
भिवंडी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाचा कल्याण-शिळ मार्गावर अपघात झाला. त्याला तातडीने ठाण्यातील महावीर जैन रुग्णालयात आणण्यात आले. मात्र हा तरुण ब्रेन डेड असल्याचे डॉक्टरांनी तपासणीत जाहीर केले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्या तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती रुग्णाल याचे संचालक डॉ. रणवीर कोष्टी यांनी दिली. यावेळी विश्वस्त अजय अशर, महेश राजदेरकर व डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
लिव्हरचे दोन भाग केले
मुंबईतील विविध रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क करून महावीर रुग्णालयात पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने हृदय, दोन किडन्या, लिव्हर, पॅनक्रिया, कॉर्निया, बोन ब्राईज असे अवयव संकलित करण्यात आले. यात लिव्हरचे दोन भाग (स्प्लिट लिव्हर) करण्यात आले. हृदय, लिव्हर आणि किडनी हे ग्रीन कॉरिडॉरद्वारे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानंतर तातडीने या रुग्णांवर या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ४० डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली.






























































