ठाणे, पालघरला पुराचा धोका!

86
flood-temghar

सामना ऑनलाईन, ठाणे

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या ठाणे, पालघर जिह्यातील तानसा व वैतरणा ही दोन्ही धरणे काठोकाठ भरली असून कधीही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहेत.  दुसरीकडे नद्यांनीही धोक्याची पातळी गाठली असून कोणत्याही क्षणी पूर येऊन परिसरातील 75 गावांचा संसार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे. असा धोक्याचा सायरन मुंबई महापालिकेने वाजवला असून तातडीने ठाणे, पालघरवासीयांना ‘जागते रहो’चा इशारा दिला आहे.

वैतरणा नदीवरील शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळ मोडकसागर धरणाच्या पाण्याची पातळी आज 160.842 मी. टीएचडी इतकी मोजली गेली आहे. धरण ओसंडून वाहण्याची पातळी 163.149 मी. टीएचडी असल्याने आणि परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मोडकसागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळील तानसा धरणात पाणीसाठा 126.781 मी. टीएचडी झाला असून  128.62 मी. टीएचडीपर्यंत पातळी गाठताच हे धरणही ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहे.

तानसा व वैतरणा या दोन्ही धरणांनी व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असल्याने ठाणे व पालघर जिह्यातील तब्बल 75 गावांना पुराचा धोका आहे. यामध्ये वैतरणा नदी परिसरातील 42 गावे तर तानसा नदी परिसरातील 33 गावांचा समावेश आहे. या गावांच्या यादीसह मुंबई महापालिकेने ठाणे, पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह  भिवंडी, शहापूर, वाडय़ाचे तहसीलदार तसेज आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला  सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कैतरणा आणि तानसा धरणाखालील आणि नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचे निर्देश द्यावेत असे पत्र पालिकेचे कार्यकारी अभियंता र. श. जोहरे यांनी संबंधित यंत्रणांना पाठकले आहे.

या गावांना पुराचा धोका

वैतरणा नदी – वाडा तालुक्यातील दाधारे, जोशीपाडा, शेले, कळंबे, शेले, तिळसे, पिंपरोली, धिंडेपाडा, गाले, अनशेत, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स (बुद्रुक), शील, गेट्स (खुर्द), अब्जे, आलमन, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर. पालघर तालुक्यातील सावरे, पाचुधारा, इंबुर- इरंबीपाडा, खडीपाडा, मनोर, उधारपाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, दवनीपाडा, खामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटणे, उंचवली, कोरीचापाडा, कोनपाडा, नवघर.

तानसा नदी – शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिंबा, खैरे. भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वजेश्वरी, महाळुंगे, गणेशपुरी. वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोरांड तर वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोड, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे, चिमणे.

आपली प्रतिक्रिया द्या