
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी केलेला आणखी एक कारनामा पुढे आला आहे. कुरुंदकरला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी तो जप्तच केला नाही. त्यामुळे गोलमाल है भाई.. असा ‘संशयकल्लोळ’ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल कुरुंदकरला अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत कळंबोली पोलीस ठाण्यात होता.त्यानंतर मात्र तो कुठे गेला त्याचा थांगपत्ता लागला नाही. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जसे नवी मुंबई पोलिसांनी पाठीशी घातले, त्याच पद्धतीने ठाणे पोलिसांनी त्याची जोरदार पाठराखण केली. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांकडे माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती त्यांना देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी सध्या पनवेल सत्र न्यायालयात सुरू असून राजू गोरे यांची सरतपासणी घेतली जाणार आहे. त्यावेळी त्यांना ठाणे पोलिसांकडे मागणी केलेल्या माहितीची गरज भासणार आहे.
.. तर आणखी पुरावे मिळाले असते
या अर्जात त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या या कारनाम्याचा उल्लेख केला आहे. जर कुरुंदकरचा मोबाईल अटक झाल्यानंतर जप्त झाला असता तर आणखीही पुरावे तपास पथकाच्या हाती लागले असते. कुरुंदकरला पोलिसांनी 7 डिसेंबर 2017 रोजी रात्री आठ वाजता अटक केली. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 8 डिसेंबरपर्यंत कळंबोली पोलीस ठाण्यातच होते. मात्र नंतर तो बंद झाला असून अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही. त्याचे सिमकार्ड सुरू करण्यासाठी पोलिसांना सहा महिने प्रयत्न करावे लागले. त्यानंतर काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले. आपण ठाणे पोलिसांकडे मागणी केलेली माहिती जर वेळेत उपलब्ध झाली तर कुरुंदकरच्या विरोधात भक्कम पुरावे तयार होऊ शकतात, असेही गोरे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.



























































