कल्याण-डोंबिवलीकरांची ‘कचराकोंडी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। डोंबिवली

ओला व सुका कचरा वेगळा न करता तसाच तो घंटागाडय़ांमध्ये टाकला जातो. मात्र यापुढे सोसायटय़ांना हा कचरा वेगवेगळा करून द्यावा लागणार आहे. यासाठी कल्याण-डोंबिवलीतील दहा हजार इमारतींना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मात्र त्यानंतरही पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्यास अशा सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱया सोसायटय़ांचा ‘कचरा’ होणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रोज जमा होणारा साडेसहाशे मेट्रिक टन कचरा कल्याण येथील आधारवाडी डेपोत टाकला जातो. या डेपोची क्षमता आता संपली असून प्रशासनाने नवे धोरण अमलात आणण्याचे ठरवले आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे 10 हजार निवासी संकुलांना एक पत्र पाठविण्यात येत असून सर्व संकुलांनी आपला कचरा ओला व सुका वेगळा करावा. जी संकुले असे करणार नाहीत त्या संकुलांचा कचरा उचलला जाणार नाही, असे स्पष्ट बजावण्यात येणार आहे. ओला कचरा रोज उचलण्यात येणार असला तरी सुका कचरा मात्र आठवडय़ातून दोन दिवस म्हणजे गुरुवारी व रविवारी उचलला जाणार आहे. त्यामुळे जी निवासी संकुले कचरा स्वतंत्र करणार नाहीत त्यांचा कचरा उचलण्यात येणार नाही.

मोठय़ा संकुलांनाही खडसावणार

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जी मोठी निवासी संपुले आहेत म्हणजे ज्या संपुलात 400 ते 500 प्लॅट आहेत, अशा सोसायटींनी त्यांच्या कचऱयाची विल्हेवाट लावायची असून तसे बंधन बांधकाम परवानगीमध्ये असल्याचे सांगण्यात आले, तशी लेखी नोटीस या मोठय़ा संकुलांना बजावण्यात येणार आहे. यासंदर्भात घनकचरा विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दुजोरा दिला.