ठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा गरजूंना ‘मायेचा घास’, भाकरी-भाजीसह धान्य वाटप

कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनता घाबरली असून रोजंदारीवर काम करणारे मजूर, आदिवासी तसेच बेघरांना दोन वेळ पोट भरणेही अवघड झाले आहे. अशांसाठी शिवसेना धाऊन आली असून रोज अन्न वाटपाचा महाकुंड धगधगत आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही सेवा सुरू असल्याचे ठाणे जिल्ह्यात दिसून येत आहे. नाशिक-पडघा मार्गावरील शेकडो गोरगरीब गावकरी तसेच मजुरांना ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व त्यांची संपूर्ण टीम गेल्या आठवडाभरापासून सढळ हस्ते मदत करीत आहे. त्यात अन्नधान्यापासून ते पाण्याच्या बाटल्या, हँड स्यानेटायझर्स, मास्क तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू समावेश आहे.

शिवसेनेचे प्रकाश पाटील हे आपल्या घरूनच रोज तीनशे भाकऱ्या व भाजी सोबत घेऊन मदत यज्ञासाठी भर उन्हात बाहेर पडतात. साईधाम खर्डी तसचे शिरोळ येथील या गावातील आश्रम शाळेत जेवणाची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. त्याशिवाय गरजूंना धान्य वाटप केले असून भोईर पाडा येथे स्थानिक गावकऱ्यांना मसाला, हळद, तूरडाळ अशा वस्तूही मोफत देण्यात आल्या आहेत.

img-20200401-wa0032_copy_700x450

रस्त्यावरून जाणाऱ्या येणार्‍या बेघरांना भाजी-भाकरी आणि पाणी प्रकाश पाटील देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा वाटत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले. या संकटकाळात मदत करणे हे माझ्यासारख्या कट्टर शिवसैनिकाचे कर्तव्य असून हे कार्य आपण करीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत पुष्पलता पाटील, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपाली पाटील, सभापती वैशाली शिंदे आदी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या