ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी बंद, 1260 कामगार बेरोजगार

‘सुपरमॅक्स’ ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या ठाण्यातील विद्युत मेटॅलिक्स कंपनीतील सर्व कामकाज दोन दिवसांपासून बंद झाले असून 5 डिसेंबरपासून अधिकृतरित्या कंपनीत टाळेबंदी केली जाणार आहे. कंपनीचे संचालक केनी अब्राहम यांनी याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे. दरम्यान, उत्पादन बंद झाल्याने तब्बल 1260 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठाण्यातील तीनहात नाका येथे विद्युत मेटालिक्स अर्थात सुपरमॅक्स या ब्लेड बनवणाऱ्या कंपनीत गेल्या काही दिवसांपासून कामगार आणि कंपनी प्रशासनात संघर्ष सुरु होता. कोरोना काळापासुन कंपनी तोटय़ात चालत आहे. त्यानंतरही कंपनीचे आर्थिक गाडे रुळावर न आल्याने कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगारही मिळाला नाही. त्यातच कच्चा माल पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची बिलेही थकली होती. त्यामुळे पंपनीच्या उत्पादनावरच परिणाम झाला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी कंपनीतील सर्व ऑपरेशन विभाग बंद झाले असून पुढील महिन्यात अधिकृत टाळेबंदी केली जाणार आहे.

कामगार न्यायालयात न्याय मागणार 

सुपरमॅक्स पंपनीचा हा वाद कामगार न्यायालयात पोहचला आहे. कर्मचाऱ्यांनी उत्पादन प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर संपाचा अवलंब करु नये आणि त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कामाच्या वेळेत कामाचे ठिकाण सोडू नये, कर्मचाऱ्याने त्यांचे काम आणि शिस्तीच्या बाबतीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे, असे पंपनीच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.