ठाणे ते स्वारगेट ई- शिवनेरीने एका महिन्यात १२ हजार प्रवाशांना ‘जिंकले’, | एसटीच्या तिजोरीत ७३ लाखांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालपरीच्या सोबत ठाणे ते स्वारगेटदरम्यान आता ई-शिवनेरीदेखील मोठ्या दिमाखाने धावू लागली आहे. या इको फ्रेंडली प्रवासाला ठाणेकरांनी अधिक पसंती दिली असून आतापर्यंत 12 हजार जणांनी गारेगार प्रवास केला आहे. आरामदायी आसन व्यवस्था, कोणताही खडखडाट नाही, भव्य खिडक्या आणि आल्हाददायक वातावरण असल्यामुळे ई-शिवनेरीने चांगलाच भाव खालला आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत 73 लाखांची भर पडली असून लवकरच आणखी ई-शिवनेरी एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

साधी, निमसाधी, शिवनेरी, शिवशाही, स्लिपर कम सीटर यांसारख्या डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेस पाठोपाठ आता इलेक्ट्रिक बस असलेली ई-शिवनेरी नव्या ढंगात महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्यानुसार ठाणे विभागात एकूण 12गाड्या आतापर्यंत आल्या आहेत. गेल्या महिन्यापासून 8 गाड्यांनी ठाणे स्वारगेट या मार्गावर एकूण 589 यशस्वी फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून एकूण 91 हजार 552 किलोमीटरचे अंतर या गाड्यांनी कापले आहे. त्यातून 73 लाख 39 हजार 768 रुपये उत्पन्न ठाणे विभागाला मिळाले आहे.

या नव्याकोऱ्या ई- शिवनेरीतून महिन्याभरात 11 हजार 871 प्रवाशांनी सुखरूप आणि आरामदायी बरोबर गारेगार प्रवासाचा आनंद लुटला आहे. तर आता 12 ई – शिवनेरी बसेस ठाणे स्वारगेट मार्गावरील प्रवाशांसाठीधावत आहेत. अन्य बसेसप्रमाणेच महिला प्रवाशांना ई-शिवनेरीमध्येदेखील तिकिटात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे स्वस्तात ठाणे ते स्वारगेट एसी प्रवास महिलांना करता येणे शक्य आहे.

ठाणे – भाईंदरदरम्यानही धावणार

ठाणे ते स्वारगेट यादरम्यान ई-बसेसना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याने लवकरच या बसेस ठाणे ते भाईंदर या मार्गावरदेखील धावणार आहेत. एसटीच्या ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ठाणे ते भाईंदरदरम्यान रोज हजारो प्रवासी नोकरी तसेच व्यवसायानिमित्त एसटीने प्रवास करीत असतात. ई-बसेसमुळे त्यांचा प्रवास थंडा थंडा कूल कूल होणार आहे.