हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ज्ञ षण्मुगरत्नम बनले सिंगापूरचे राष्ट्रपती

हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ञ थरमन षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्रपती बनले आहेत. सिंगापूरचे 9 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी आज शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असणार आहे. 66 वर्षीय थरमन षण्मुगरत्नम यांचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. प्रसिद्ध अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच सिंगापूरच्या राजकारणात त्यांचे मोठे नाव आहे. 2011 ते 2019 पर्यंत षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे उपपंतप्रधान होते. त्यांनी मंत्री म्हणून विविध खात्यांचे काम सांभाळले. सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते. 1 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत षण्मुगरत्नम हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले. विशेष म्हणजे सिंगापुरातील चिनी नागरिकांचा त्यांना पाठिंबा आहे. षण्मुगरत्नम हे सिंगापूरमध्ये हिंदुस्थानी वंशाचे तिसरे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी सेल्लापन रामनाथन आणि देवर नायर हे सिंगापूरचे राष्ट्रपती होते.