ठसा – प्रा. बाळ पोतदार

>> प्रशांत गौतम

काही माणसे मनात घर करून राहतात. बाळ पोतदार (प्रा. आनंद कारके, बिद्री) हे त्यातीलच एक नाव होय. संगीत, साहित्य, चित्रकला आदी क्षेत्रांत त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे. आयुष्यभर सर्व क्षेत्रांत लीलया संचार केला. आजरा येथील सुभाष विभुते यांच्या ‘ऋग्वेद’ मासिकाचे आणि त्यांचे ऋणानुबंध गेल्या दोन दशकांचे होते. अनेक वर्षे त्यांनी बालसाहित्य जोपासण्यासाठी काम केले. व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्ततेनंतर ते करवीर तालुक्यातील केर्ले या गावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या हनुमान हायस्कूल या माध्यमिक शाळेत व तत्पूर्वी कोकणातील एका शाळेत अल्पकाळ गणिताचे शिक्षक होते. पुढील काळात बाळ पोतदार हे बिद्री येथील दूधसाखर शिक्षण संस्थेच्या दूधसाखर विद्यानिकेतन हायस्कूलमधून गणित व विज्ञानाचे शिक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून पाच वर्षांपूर्वी सेकानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतरही ते अनेक सांस्कृतिक, साहित्यविषयक उपक्रमांत सहभागी होत असत. औपचारिकदृष्टय़ा ते गणित व विज्ञान विषयांचे शिक्षक होते, पण अनौपचारिकदृष्टय़ा ते अनेक विषयांचे शिक्षक होते. संगीताचार्य नाना कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले. वाङ्मय लेखन व संगीतावर त्यांची नितांत निष्ठा होती. 1990 चा काळ लक्षात घेतला तर संगीताचे धडे देणारे गुरू बिद्री परिसरात म्हणण्यापेक्षा कोणत्याच खेडेगावात उपलब्ध नव्हते. अशा स्थितीत बिद्रीच्या प्राथमिक व माध्यमिक विभागांकडे संगीताचार्य नाना कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. पोतदार यांनी नाना कुलकर्णी यांच्याकडून हार्मोनियम, तबलावादनाचे व जलतरंगवादनाचे शास्त्रीय ज्ञान घेतले. ज्ञान केवळ आपल्याकडेच न ठेवता ते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला देत राहिले. संगीताचे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. दूधसाखर शिक्षण संस्थेत पोतदार यांच्याशिवाय कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसे. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरिरीने सहभागी होत असत. तसेच आजरा येथील मुलांचे मासिक ऋग्वेद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, करवीर साहित्य परिषद, अक्षय सागर साहित्य सभा अशा साहित्य संस्थांशी ते निगडित होते. त्यांनी कविता, कथा व लेख लिहिले. आपल्या संस्थेत व परिसरात त्यांनी कथा व कविता लेखनाच्या अनेक कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांत ते लेखनाचे विविध प्रयोग करीत असत. तसे ते त्या काळातील प्रयोगशील शिक्षक होते. जमलेल्या नवोदित कवींना वाक्य लेखनासाठी ते एक विषय देत असत. त्या विषयावरील कविता लिहिण्यासाठी स्वतः एक ओळ सांगत असत आणि प्रत्येकाला एक ओळ रचायला सांगत असत. अशी सगळ्यांची मिळून एक कविता तयार होत असे. अशा कार्यशाळेतून त्यांनी अनेक कवी निर्माण केले आहेत. प्रतिभा ही ईश्वरदत्त देणगी मानली जाते. पण साहित्यनिर्मिती ही प्रयत्न साध्य बाब आहे, हे त्यांनी अनेक साहित्यविषयक कार्यशाळांतून दाखवून दिले आहे. अनेकांच्या कथा, कादंबऱ्या, कवितांसाठी त्यांनी उत्कृष्ट व बोलकी चित्रे रेखाटण्याचे काम केले आहे. अनेक दिवाळी अंकांच्या संपादनाचे काम केले आहे. अनेक दिकाळी अंकांतून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ‘कृषीराज’ या दिवाळी अंकाचे काम ते करीत होते. त्यांनी अनेक बालकविता लिहिल्या आहेत. तसेच बालवाङ्मयाचे संपादन केले आहे. बालकवितेद्वारे लहान मुलांचे भावनिक विश्क समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. विविध रंगसंगतीत फलक लेखन कसे करायचे असते, हे पोतदार यांच्याकडूनच शिकावे. बोरूने सुबक व वेगवेगळ्या पद्धतीने अक्षर काढावे ते पोतदार यांनीच. नीब कट करून सुंदर हस्ताक्षर रेखावे ते पोतदारांनीच. इतकी हस्ताक्षराची विविधता त्यांच्याकडे होती. त्यांचे मृदू आणि मितभाषी व्यक्तिमत्व मित्रपरिवारात परिचित होते. कमी बोलणे अथवा बोलायचेच नाही, हा त्यांचा स्वभाव होता. कृतीतून व्यक्त व्हायचे, अशी त्यांची वृत्ती होती. इतकी वर्षे त्यांनी हा आपला स्वभाव स्थिर ठेवला. असे ते स्थितप्रज्ञ होते, बाळ पोतदार हे लोकप्रिय कवी, गीतकार लेखक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, उत्कृष्ट निवेदक, खुमासदार संपादक, चिंतनशील विवेचक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे एक लेखक मित्र होते.