ठसा – प्राचार्य रा.रं. बोराडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

लोकप्रिय ग्रामीण कथा, कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरी लेखनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळय़ाच्या औचित्याने आज संभाजीनगरातील एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभात संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि समारोपात ताम्रपटकार रंगनाथ पठारे असतील. आज बोराडे सर 82 वर्षांचे आहेत. याही वयात लेखन-वाचनाचा दांडगा उत्साह आहे. अशा लेखकाच्या प्रदीर्घ साहित्य प्रवासातील त्यांची ‘पाचोळा’ ही अतिशय गाजलेली 1971 साली लिहिलेली कादंबरी मराठी साहित्याच्या कादंबरी इतिहासात आजही टॉप टेनमध्ये आहे. खरे तर ती लिहिण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली. मात्र, त्यानंतरच्या प्रवासात या कादंबरीने मराठी साहित्यातील अभिजात कादंबरी अशी लोकप्रियता मिळवली. त्याही काळात बोराडे कथा लेखनाच्या माध्यमातून सत्यकथा, मौज परिवारापर्यंत पोहचले होते. महाराष्ट्रातील चोखंदळ साहित्य रसिक, वाचक, लेखक जाणकारांनी या साहित्याचे भरभरून स्वागत केले. ‘मळणी’ या कथासंग्रहाने कथाकार म्हणून तर ‘पाचोळा’ या कादंबरीने त्यांना कादंबरीकार अशी ओळख मिळवून दिली. ही कादंबरी 1971 साली मौज प्रकाशनाने प्रकाशित केली. ती लघु कादंबरी असली तरी कादंबरीचे सर्वोत्तम निकष त्यात जाणकार, अभ्यासकांनी शोधले. ती इंग्रजीत एनबीटीकडून फॉल नावाने अनुवादित झाली, तर हिंदीत ‘पाचोला’ या नावाने नवी दिल्लीच्या विकास प्रकाशन संस्थेकडून अनुवादित झाली. अशी ही बहुचर्चित ठरलेली व पन्नाशी गाठलेली कादंबरी नेमकी काय आहे. याची वाचकांना उत्सुकता नक्कीच असणार! गावगाडय़ातील वेदनांच्या पाचोळय़ाची कादंबरी गंगाराम शिंपी, त्याची बायको पार्वती, मुलगा, मुलगी अशा चौकोनी कुटुंबाची आहे. यातील गाव, कादंबरी लेखनातील पात्र, वातावरण, लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. लातूर-धाराशिव भागातील प्रदेशाचे वर्णन त्यात येते. इथल्या वाडय़ा, वस्त्या, चोहीकडे पसरलेले माळरान, धनगरवाडी ही वस्ती, मेंढरं, मेंढपाळ यांचे वर्णन येते. सोबतीला गंगाराम शिंप्याच्या (टेलर) दुःख वेल्हाळाची गोष्ट असते. यात प्रमुख नायिका पार्वती ही असते. तिचेच प्रथम पुरुषी निवेदन असते. गोष्ट सांगताना अविर्भाव नसतो तर त्यातून ती जबाबदार स्त्र्ााrचे व्यक्तिमत्त्व साकारते. गंगारामचे चौकोनी कुटुंब! सातवीत शिकणारा पोरगा-भाना व सदा सर्वकाळ कायम भुकेलेली असलेली तीन वर्षांची तानी मुलगी. आधुनिकतेमुळे ग्रामीण कारागिरांच्या जीवनात निर्माण झालेला भावनिक ताणतणाव अत्यंत प्रभावी लेखन सामर्थ्याने बोराडे लिहितात. कुटुंबाची कथा पुढे जात असताना प्रसंगानुरूप काही पात्रं येतात. एकूणच कादंबरी लेखनास खास धाराशिव परिसरातील ग्रामीण भाषेचा टच असल्याने कादंबरीसकट पात्रही जिवंत आणि रसरशीत होतात. या व अशा अनेकविध गुण विशेषांमुळे पाचोळाने पन्नाशी गाठली आणि मराठी साहित्याच्या कादंबरी लेखनात आपले अभिजात स्थान कायम ठेवले. एखादा लेखक असता तर पहिल्या लेखनाच्या यशात थांबला असता. बोराडे एक दोन कथा-कादंबरी लिहून थांबले नाहीत तर त्यांचा लेखन प्रवास खूप दमदार व विविधांगी आहे. वाचक, श्रोता, जसे काळानुरूप बदलतात, तशी त्यांच्या लेखनाची भाषा सर्वसामान्य, निरक्षरांनाही कळेल, अशी साधी-सोपी व अर्थपूर्ण आहे. वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणे, हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्टय़ सांगता येतील. त्यांच्या अनेक कथांचा शेवट धक्कादायक असतो. कथा-कादंबरीतून अनेक रंगा-ढंगाच्या व्यक्तिरेखा भेटतात. मात्र, एखाद्या कथा-कादंबरीतले शेवटचे वाक्यच असे दमदार असते की, ज्यामुळे वाचक स्तंभित होतात. जवळपास 15 कथासंग्रह, 12 कादंबऱया, 15 नाटपं-एकांकिका, ग्रामीण साहित्य (समीक्षासंग्रह) बालसाहित्य, अशी वैविध्यपूर्ण साहित्य संपदा सांगता येते. यात महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे तो त्यांच्या आमदार सौभाग्यवती या चर्चित कादंबरीचा. यातील स्त्र्ााr-पुरुषांमधील सत्ता-संघर्ष हा महत्त्वाचा विषय लेखकाने मांडला आहे. त्याचे हिंदी रूपांतर श्रीनिवास जोशी यांनी केले. मराठीतही याच नावाचे नाटक रंगभूमीवर आले आणि एक काळ गाजवला. यात प्रमुख भूमिका ज्योती चांदेकरांनी साकारली. याच कादंबरीवर आधारित मराठी सिनेमाही येतो आहे. साकेत प्रकाशनाने ‘राजकीय कादंबरी आणि आमदार सौभाग्यवती हे महत्त्वाचे पुस्तकही काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले. बोराडे यांच्या साहित्यावर अभ्यास मांडणारे अभ्यास ग्रंथ घर शिवार, (संपादन डॉ. चंद्रकुमार नलगे) शिवारातील शिल्पकार (अथर्व प्रकाशन) असेही वाचकांसाठी महत्त्वाचे आहेत. लेखन साहित्य योगदानासाठी अनेक शासकीय-निमशासकीय पुरस्कार, विविध संमेलनाचे अध्यक्ष पद, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद त्यांना लाभले. एवढी वाचकप्रियता एखाद्याच लेखकाला लाभते. ते भाग्य बोराडे यांना लाभले आहे..