.. म्हणूनच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार खासगीत करण्यात आले, हेमामालिनी यांनी सांगितलं यामागचं कारण

अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांनी त्यांची अंत्ययात्रा न काढताच अगदी खासगीमध्ये विधी उरकले. त्यामुळे चाहते निराश झाले होते. परंतु यामागचे नेमके काय कारण आहे हे अखेर हेमामालिनी यांनी सांगितले आहे.

धर्मेंद्र म्हणजेच बाॅलीवूडचे ही मॅन आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याचा परिणाम त्यांच्या चाहत्यांपासून ते जवळच्या लोकांपर्यंत सर्वांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अभिनेत्री हेमामालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यावर इतक्या खासगी पद्धतीने का अंत्यसंस्कार केले यावर आता भाष्य केले आहे. युएईचे चित्रपट दिग्दर्शक हमाद अल रायमी यांच्याशी धर्मेंद्र यांची घट्ट मैत्री होती. त्यांच्याशी भेटी दरम्यान हेमामालिनी यांनी अंत्यसंस्कार खाजगीमध्ये का केले याबद्दल सांगितले.

हमाद यांच्याशी भेटीदरम्यान हेमा मालिनी यांनी जड अंतःकरणाने सांगितले की, धर्मेंद्र यांनी त्यांचे दुःख कधीही जगाला दाखवले नाही. ते स्वतःला कधीच कमकुवत दाखवत नव्हते. इतकेच काय तर त्यांनी त्यांच्या नातेवाईंकानाही त्यांचे दुःख कधीही दाखवले नाही. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची प्रकृती इतकी वाईट होती की, कोणीही ते पाहू शकत नव्हते. म्हणूनच कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा सन्मान ठेवत त्यांचे अंत्यसंस्कार खासगीमध्ये उरकले.